घरातून सहा हजारांची रोकड लंपास; पोलिसांची तत्पर कारवाई
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे घरफोडी करून रोकड चोरून नेल्याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत संशयिताला अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव येथील रहिवासी अशोक खंडेराव देशमुख (वय ६५) यांच्या घरात ९ जुलै रोजी सकाळी सुमारे ११ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने घराचा दरवाजा उघडून प्रवेश केला. घरातील लाकडी कपाटात ठेवलेली ६ हजार रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली.
या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) व ३३१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांच्या मदतीने प्रवीण सुभाष पाटील (रा. बिलवाडी, ता. चाळीसगाव) याला संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गणेश चव्हाण करीत असून, चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.









