तांत्रिक बिघाडाचा प्राथमिक अंदाज; सुदैवाने जीवितहानी टळली, पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुक्यातील विदगाव पुलावर गुरुवारी धावत्या स्विफ्ट डिझायर कारला अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. जळगाव शहराच्या दिशेने येत असताना पुलाच्या मध्यभागी कारने पेट घेतल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, स्विफ्ट डिझायर कार विदगाव पुलावरून जळगावकडे येत असताना वाहनात अचानक तांत्रिक बिघाड झाला. काही क्षणांतच इंजिनमधून धूर निघू लागला आणि पाहता पाहता संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनेमुळे पुलावरून जाणाऱ्या वाहनचालकांमध्ये घबराट पसरली.
भर पुलावर कार जळत असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव इतर वाहनचालकांनी आपली वाहने थांबवली. परिणामी पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि काही काळ वाहतूक ठप्प झाली. आगीमुळे कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी वाहनाला आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित यंत्रणांकडून घटनेबाबत अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे.









