डीएनए अहवाल, वैद्यकीय पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षींवर न्यायालयाचा निर्णय
अमळनेर ( प्रतिनिधी ) – चोपडा तालुक्यात प्रसूतीनंतर नवजात बाळाला नाल्यात टाकल्याप्रकरणी एका महिलेला अमळनेर जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश छाया पाटील यांनी हा निर्णय दिला.


नाल्यात आढळले होते नवजात बाळ
६ ऑगस्ट २०२२ रोजी चोपडा तालुक्यातील एका गावात उत्तरकार्याचा कार्यक्रम सुरू असताना ग्रामस्थांना नाल्याकडून नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी तत्काळ पोलीस पाटलांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटलांनी बाळाला बाहेर काढून कापडात गुंडाळत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
तपासात उघडकीस आली घटना
गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी गावातील नुकत्याच प्रसूत झालेल्या महिलांची माहिती गोळा केली. आशा सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने तपास सुरू असताना एका महिलेची प्रसूती झाल्याची नोंद नसल्याचे आढळून आले. पुढील चौकशीत संबंधित महिलेने बाळाला नाल्यात टाकल्याची कबुली दिल्यानंतर तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पुराव्यांच्या आधारे शिक्षा
या प्रकरणात पोलीस पाटील, आशा सेविका, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षी तसेच डीएनए अहवालासह उपलब्ध पुराव्यांचा विचार करून न्यायालयाने संबंधित महिलेला दोषी ठरवत तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अॅड. किशोर बागुल मंगरुळकर यांनी कामकाज पाहिले.









