५ लाखांच्या घरफोडीचा अद्याप उलगडा नाही; पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवर नागरिकांकडून सवाल
शिरसोली (प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथील शिक्षक कॉलनीत स्टॅम्प वेंडर राजेंद्र दौलत आंबटकर (बारी) यांच्या घरात झालेल्या पाच लाख रुपयांच्या घरफोडीचा उलगडा दोन महिने उलटूनही झालेला नाही. विशेष म्हणजे, या प्रकरणातील संशयित चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाल्याचे सांगितले जात असतानाही तपासाला अपेक्षित यश आलेले नसल्याने स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


राजेंद्र आंबटकर हे कुटुंबासह पुणे येथे गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा कापून प्रवेश केला आणि घरातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता.
घटनेनंतर श्वान पथक, ठसे तज्ज्ञ आणि पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले. मात्र, एवढे ठोस धागेदोरे उपलब्ध असतानाही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड तसेच संपूर्ण तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि इतर तपास साहित्य उपलब्ध असतानाही तपास का रखडला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, आंबटकर कुटुंबीयांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून तपासाचा आढावा घ्यावा, संबंधित तपास यंत्रणेला स्पष्ट निर्देश द्यावेत आणि घरफोडीचा तातडीने उलगडा करून आरोपींना अटक करावी, अशी मागणी केली आहे.
या घटनेमुळे शिरसोली परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, घरफोडीचा छडा कधी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









