शनिपेठ पोलिसांची तात्काळ कारवाई; धारदार चॉपर जप्त, गुन्हा दाखल
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील उज्वल चौक परिसरात भररस्त्यात हातात धारदार चॉपर घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला शनिपेठ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत जेरबंद केले. या कारवाईत त्याच्याकडून धारदार चॉपर जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल अरुण सपकाळे (वय २६, रा. तानाजी मालुसरे नगर, पिवळ्या भिंतीजवळ, जळगाव) हा ६ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास उज्वल चौकात हातात चॉपर घेऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत होता.
याबाबतची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळताच त्यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने घटनास्थळी धाव घेत संबंधिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक धारदार चॉपर जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस अंमलदार रविंद्र साबळे यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय निकम करीत आहेत.









