जळगांव (प्रतिनिधी) : भोईटे नगर, जळगांव येथील रहिवासी डॉ. उमैर रियाज देशपांडे यांनी मुंबई येथील ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे. जे. रुग्णालय समूह येथून एम.बी.बी.एस.च्या अंतिम परीक्षेत विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

डॉ. उमैर देशपांडे यांनी एमबीबीएसच्या अंतिम परीक्षेत ६२.६७ टक्के गुण मिळवून प्रथम श्रेणीत यश संपादन केले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जळगांव येथील सेंट टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले. शालेय जीवनापासूनच ते अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही सक्रिय राहिले असून विविध उपक्रमांमध्ये त्यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला आहे.
उमैर हे राज्यस्तरीय बॅडमिंटनपटू असून, खेळ आणि शिक्षण यांचा समतोल साधत त्यांनी हे यश मिळविले आहे. वैद्यकीय शिक्षणाचा प्रवास आव्हानात्मक असला तरी जिद्द, परिश्रम आणि सातत्य यांच्या बळावर त्यांनी ही यशस्वी कामगिरी केली. पुढील वैद्यकीय उच्च शिक्षणामध्ये उत्तुंग यश संपादन करण्याचा शाश्वत संकल्प डॉ.उमैर याने व्यक्त केला आहे.
आपल्या यशाचे श्रेय देताना त्यांनी वडील रियाज देशपांडे, (संचालक – देशपांडे मेडिकल),तसेच आई डॉ. फरहाना रियाज देशपांडे यांच्या मार्गदर्शन, प्रोत्साहन व पाठिंब्याचा विशेष उल्लेख केला. तसेच एम.बी.बी.एस. शिक्षणादरम्यान डॉ. एहतेशाम देशमुख व डॉ. शोएब देशमुख (अकोला )यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. उमैर हे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांचे भाचे आहेत. त्यांच्या या यशाबद्दल आजोबा प्रा. डॉ. तालीब देशमुख, आजोबा सलीम देशपांडे, डॉ. मोईज देशपांडे, रमीज देशपांडे, डॉ. परवेज देशपांडे, प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख, प्रा. डॉ. मो. आकीब देशमुख, अरशद देशमुख, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील या उल्लेखनीय यशामुळे डॉ. उमैर देशपांडे यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.









