प्रोसेसिंग फीच्या नावाखाली RTGS द्वारे रक्कम उकळली; कर्ज न मिळाल्याने प्रकार उघड
चाळीसगाव, ( प्रतिनिधी ) :- १० कोटी रुपयांचे बँक कर्ज कोणतीही अडचण न येता मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची ५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद हिरालाल चौधरी (वय ४७, रा. शास्त्रीनगर, चाळीसगाव) यांनी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांना मोठ्या रकमेच्या कर्जाची आवश्यकता असल्याने संशयिताने त्यांचा विश्वास संपादन केला. ‘राष्ट्रीयीकृत बँकेकडून १० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो, त्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही,’ असे आश्वासन देत प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली.
फिर्यादी यांनी आपल्या पत्नीच्या नावावरील सेंट्रल बँकेच्या खात्यातून संशयिताने दिलेल्या बँक खात्यावर १५ फेब्रुवारी २०२५ रोजी RTGS द्वारे ५ लाख रुपये वर्ग केले. मात्र, त्यानंतर ना कर्ज मंजूर झाले, ना दिलेली रक्कम परत मिळाली. वारंवार पाठपुरावा करूनही संशयिताने टाळाटाळ केल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.
या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८ (४) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, मोठ्या कर्जाच्या आमिषाला बळी पडू नये तसेच कोणतीही आर्थिक देवाणघेवाण करण्यापूर्वी संबंधित व्यक्ती व संस्थेची खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.









