पाच गावांवर एकाच वेळी धाडसत्र; २ कोटींपेक्षा जास्त मुद्देमालासह सराईत गुन्हेगार जेरबंद, पोलीस अधीक्षकांचे कडक पाऊल
मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) :- तालुक्यातील ‘ड्रॉप केस’ आणि सोशल मीडिया फसवणुकीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या पाच गावांवर जळगाव जिल्हा पोलिसांनी पहाटेच्या सुमारास आतापर्यंतची सर्वात मोठी आणि यशस्वी मोहीम राबवली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या “ऑपरेशन ड्रॉप केस” अंतर्गत लालगोटा, हलखेडा, मधापुरी, जोंधनखेडा आणि चारठाणा या गावांमध्ये एकाच वेळी धाडसत्र राबवून पोलिसांनी गुन्हेगारांचे कंबरडे पाडले आहे. ऐन पहाटे झालेल्या या धडक कारवाईमुळे जिल्हाभरातील गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.


कथित दुर्मिळ वस्तूंचे आमिष आणि ‘ड्रॉप केस’चा सापळा
मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मधापुरी आणि हलखेडा गावांची लोकसंख्या अवघी १००० ते १२०० च्या दरम्यान असून लालगोटा गावात केवळ ३०० ते ४०० लोक राहतात. मात्र, या अल्प लोकसंख्येच्या गावांतून सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरातील श्रीमंत लोकांना जाळ्यात ओढले जात होते. काळी हळद, नागमणी, रेड मर्क्युरी, सफेद बिबा, उलटी वासन, सुलेमानी पत्थर, सेकंड करन्सी, अॅल्युमिनियम भंगार, जुने सोने, कॉपर, शंख आणि डबल इंजिन यांसारख्या कथित दुर्मिळ वस्तूंचे व्हिडिओ व्हायरल करून लोकांना मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले जायचे. या आमिषाला बळी पडून लोक गावात पोहोचले की, त्यांना नकली नोटा किंवा बनावट वस्तू दाखवून लुटले जायचे. अनेकदा विरोध करणाऱ्यांना मारहाण करून पैसे हिसकावले जात आणि त्यांच्याकडे बनावट हरणाचे किंवा वाघाचे कातडे ठेवून “पोलिसांत गेल्यास वन्यजीव तस्करीच्या गुन्ह्यात अडकवू” अशी धमकी दिली जायची. पोलिसांच्या भाषेत यालाच ‘ड्रॉप केस’ म्हटले जाते. गेल्या तीन वर्षांत या परिसरात १० दरोडे, १ खुनासह दरोडा, १ खून, ७ जबरी चोऱ्या, १६ फसवणुकीचे गुन्हे, १ दरोड्याचा प्रयत्न आणि २ सरकारी नोकरांवरील हल्ले असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
शस्त्रे, रोकड आणि वन्यजीवांच्या कातड्यासह मोठा मुद्देमाल जप्त
या मोहिमेदरम्यान पोलिसांनी विविध गुन्ह्यांची नोंद करत मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल आणि वाहने जप्त केली आहेत. यामध्ये एकूण २०,००,००० रुपये रोख रक्कम (वीस लाख रुपये), अंदाजे ३०,००,००० रुपये किमतीचे ३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे ८,००,००० रुपये किमतीचे ४ किलो चांदीचे दागिने, दोन गावठी कट्टे (एक लाकडी मूठ असलेली लोखंडी रिव्हॉल्व्हर व एक काळी मूठ-चंदेरी बॅरल असलेली लोखंडी पिस्तूल) आणि ३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय, लहान मुलांच्या बँकेच्या (Children Bank of India) १०० रुपयांच्या नोटांचे दोन बनावट बंडल, ३० मोबाईल फोन, ०४ चार चाकी वाहने आणि ०६ दुचाकी वाहने हस्तगत केली आहेत. तसेच वन्यप्राणी संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करत १ नग हरणाचे कातडे, १ नग कोल्ह्याचे कातडे आणि १ नग सशाचे (Rabbit) कातडे जप्त केले आहे.
सराईत आरोपींना बेड्या आणि दाखल गुन्हे
या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी अनेक सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. शस्त्र अधिनियम कलम ३/२५ अन्वये फरेज राजू पवार (वय ४०, रा. मधापुरी) आणि रामजाने राईसाहेब भोसले (वय ३२, रा. हलखेडा) यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ नुसार आक्काबाई जोगिंदर भोसले (वय ३२, रा. हलखेडा) आणि रोहित सुदेश पवार (वय ३२, रा. मधापुरी) यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४) नुसार राजकिसन जोगिंदर भोसले, दया जोगिंदर भोसले, शिवकिसन जोगिंदर भोसले, आक्काबाई जोगिंदर भोसले आणि जोगिंदर राजवंती भोसले (सर्व रा. हलखेडा) यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. वन्य प्राणी संरक्षण अधिनियम कलम ९ नुसार गांझी दर्यासिंग भोसले (रा. हलखेडा जुने) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय, २०२१ मधील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी विलास नरविलाल पवार (रा. हलखेडा) आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(२) मधील आरोपी अजय दादा पवार (रा. हलखेडा) या दोघांनाही पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.
२०० हून अधिक पोलीस अधिकारी व अंमलदारांचा फौजफाटा
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने आज दिनांक १९ जून २०२६ रोजी पहाटे हे कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या भव्य मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ (तसेच प्रभारी मुक्ताईनगर) श्री केदार बारबोले, परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत दरेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. राहुल गायकवाड, भुसावळ शहरचे पो. नि. महेश गायकवाड, भुसावळ तालुक्याचे पो. नि. निलेश गायकवाड, भुसावळ शहरचे पो. नि. राहुल वाघ, बोदवडचे पो. नि. आशिष लव्हांगळे, सावदा पोलीस ठाण्याचे स.पो.नि. विशाल पाटील, नशिराबादच्या स.पो.नि. योगिता नारखेडे, निंभोरा पोलीस ठाण्याच्या स.पो.नि. मीरा देशमुख, वरणगावचे स.पो.नि. अमित कुमार बागुल आणि पोलीस दलाचे एकूण २०० पोलीस अंमलदार व आरसीपी (RCP) चे जवान सहभागी झाले होते. गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी भविष्यातही अशा कारवाया सुरू राहतील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.









