आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू


मिळालेल्या माहितीनुसार, सागर राजेंद्र तेली (वय ३५) हे यावल तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात कारकून म्हणून कार्यरत होते. ते फैजपूर येथील सराफ कॉलनी परिसरात वास्तव्यास होते. बुधवारी (दि. १७) दुपारी सुमारे १२ वाजेच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरातील छताच्या पंख्याच्या हुकाला सूती दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या अचानक घडलेल्या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. सागर तेली यांचे नुकतेच लग्न झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. या घटनेची माहिती गुणवंत दिलीप तेली यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मयताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी फैजपूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.









