
वावडदा केंद्रावर धडक कारवाई; २६ हजार ७७० रुपयांची संशयास्पद रोकड जप्त
जळगाव (प्रतिनिधी):- शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण योजनेअंतर्गत मोफत दिल्या जाणाऱ्या अत्यावश्यक व सुरक्षा संचासाठी लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी करणाऱ्या एका तरुणीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. जळगाव तालुक्यातील वावडदा येथील वितरण केंद्रावर गुरुवारी झालेल्या या कारवाईत १०० रुपयांची लाच स्वीकारताना तरुणी जाळ्यात अडकली. यावेळी घटनास्थळावरून तब्बल २६ हजार ७७० रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली.


एसीबीच्या माहितीनुसार, भाग्यश्री पाटील (वय २०, रा. सामनेर, ता. पाचोरा) ही तरुणी वावडदा येथील कीट वितरण केंद्रावर खाजगी स्वरूपात कार्यरत होती. जळगावातील एका बांधकाम कामगाराने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेअंतर्गत अत्यावश्यक व सुरक्षा संच मिळविण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यानुसार त्यांना ४ जून रोजी वावडदा केंद्रावर कीट स्वीकारण्यासाठी बोलावण्यात आले होते.
केंद्रावर पोहोचल्यानंतर भाग्यश्री पाटील हिने तक्रारदाराला केवायसी प्रक्रियेसाठी दोन फॉर्म खरेदी करावे लागतील, असे सांगत १०० रुपयांची मागणी केली. मात्र शासनाकडून दिल्या जाणाऱ्या या संचासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याचे अर्जावर स्पष्ट नमूद असल्याने तक्रारदाराला संशय आला. त्यांनी तत्काळ जळगाव एसीबी कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या पथकाने सापळा रचला. पंचांसमक्ष भाग्यश्री पाटील हिने १०० रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने तिला ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान भाग्यश्री पाटीलच्या अंगझडतीत १३ हजार ६७० रुपये रोख मिळून आले. तसेच वितरण केंद्रावरील झेरॉक्स मशीनजवळ ठेवलेल्या स्टीलच्या डब्यात आणखी १३ हजार १०० रुपये आढळून आले. केवायसीच्या नावाखाली लाभार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात वसुली सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, एकूण २६ हजार ७७० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त केलेल्या रोकडबाबत आणि संभाव्य गैरव्यवहाराबाबत अधिक तपास सुरू आहे.
ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, महिला पोलीस नाईक रेश्मा अवतारे, सुरेश पाटील, बाळू मराठे आणि राकेश दुसाने यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करीत आहेत.









