१७ वर्षीय पीडितेच्या तक्रारीनंतर नराधम चुलत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
जळगाव (प्रतिनिधी) – नात्यातील विश्वासाला आणि पवित्र्याला पूर्णपणे काळीमा फासणारी एक संतापजनक आणि धक्कादायक घटना सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.


आपल्याच घरात राहणाऱ्या अवघ्या १७ वर्षे ३ महिने वय असलेल्या अल्पवयीन पुतणीला धाक दाखवून तिच्यावर सख्ख्या चुलत्यानेच वारंवार अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी चुलत्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिचा चुलता एकाच घरात राहतात. पीडिता आरोपीच्या अभिरक्षेत (तातडीच्या देखरेखीखाली) असताना, आरोपीने तिच्या हतबलतेचा गैरफायदा घेतला. दि. १२ नोव्हेंबर २०२५ पासून ते दि. २९ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास, आरोपीने पीडितेच्या इच्छेविरुद्ध घरात वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केला.
या नराधमाने केवळ अत्याचारच केला नाही, तर पीडितेने या छळाबाबत कोणाकडेही घरात सांगितल्यास “तुला जीवे ठार मारून टाकीन”, अशी भयानक धमकी दिली होती. आरोपीच्या या दहशतीमुळे पीडित मुलगी अनेक महिने हा नरकयातना देणारा छळ सहन करत होती. अखेर धीर एकवटून पीडितेने या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत पोलिसांत धाव घेतली.
घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलली. उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) श्री. केदार बारबोले (भुसावळ, अतिरिक्त चार्ज मुक्ताईनगर) यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आणि तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. तसेच सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) श्री. विशाल पुंडलिक पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन पुढील तपासाला गती दिली.
पीडितेच्या जबानीवरून सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १३६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४ (२)(f), ३५१ (२),(३) सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो कायदा) कलम ४, ६ आणि ५ (n) प्रमाणे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मुख्य आरोपी याला तातडीने अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक (पो.उ.नि.) श्री. राहुल सानप करत आहेत.









