जळगाव तालुका पोलिसांनी ट्रॅक्टर-ट्रॉलीसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीविरोधातील मोहिमेत जळगाव तालुका पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई करत कानळदा गावालगत अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले. या प्रकरणी एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाळूसह सुमारे ४ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


जळगाव तालुका पोलीस ठाण्यात CCTNS गुरनं १५४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) सह गौण खनिज विकास व विनियमन अधिनियम कलम २१ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४८(७) आणि ४८(८) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहाटेच्या सुमारास धडक कारवाई
ही कारवाई शुक्रवार, २९ मे रोजी पहाटे १.३० वाजेच्या सुमारास कानळदा गावालगत असलेल्या महर्षी कन्व आश्रमाजवळील कच्च्या रस्त्यावर करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल तुषार शाम जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयेश पांडुरंग ठाकरे (वय २४, रा. कानळदा, ता. जि. जळगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाळू जप्त
पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ३ हजार रुपये किंमतीची एक ब्रास अवैध वाळू जप्त केली. तसेच ४ लाख रुपये किंमतीचे स्वराज ७४४ एफई कंपनीचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर (क्रमांक एमएच १९ सीझेड ६७०७) आणि विना क्रमांकाची निळ्या रंगाची ट्रॉली असा एकूण ४ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विनापरवाना वाहतूक उघड
तपासादरम्यान आरोपीकडे वाळू वाहतुकीसाठी कोणताही शासकीय परवाना नसल्याचे समोर आले. अवैध गौण खनिज वाळूची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचा आरोप पोलिसांनी फिर्यादीत नमूद केला आहे.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका प्रविण संतोष पाटील पुढील तपास करीत आहेत.









