जळगाव ( प्रतिनिधी ) – बोदवड तालुक्यातील येवती गावात जुन्या वादाच्या कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बोदवड पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध दंगल, मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० मे रोजी रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास फिर्यादी सरताजबी इक्बालखाँ पठाण (वय ३५, रा. येवती ता. बोदवड) यांच्या घरासमोर ही घटना घडली. जुन्या वादाच्या कारणावरून आरोपींनी घरासमोर येत शिवीगाळ करत बाहेर येण्यास सांगितले. यावेळी फिर्यादींच्या कुटुंबीयांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी लोखंडी रॉड व इतर वस्तूंनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या मारहाणीत आबेदाबी दिलावरखाँ पठाण, इक्बालखाँ दिलावरखाँ पठाण तसेच इतर कुटुंबीय जखमी झाले. आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी योगेश युवराज माळी, गजानन गोविंदा माळी, आनंदा तुकाराम माळी, मयूर श्रीराम महाजन, वासुदेव मकुंदा माळी, राहुल सुरेश बावस्कर आणि वैभव बाळू कराळे (सर्व रा. येवती, ता. बोदवड) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









