मालकाने पाठलाग करताच संशयित रिक्षा टाकून पसार; पोलिसांत गुन्हा दाखल
चोपडा (प्रतिनिधी) :- शहरातील के.जी.एन. कॉलनी परिसरातून मालवाहू तीनचाकी रिक्षा चोरी करण्याचा प्रयत्न उधळून लावल्याची घटना रविवारी पहाटे घडली. मालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठलाग केल्याने संशयित आरोपी रिक्षा रस्त्यातच सोडून पसार झाला. या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख युसुफ शेख फत्तू (वय ४२, रा. के.जी.एन. कॉलनी, चोपडा) यांनी आपली PIAGGIO कंपनीची मालवाहू तीनचाकी रिक्षा (क्र. MH-05-BH-8083) घरासमोर उभी केली होती. रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास आरोपी अरबाज अजीज खाँ पठाण (रा. के.जी.एन. कॉलनी, चोपडा) याने रिक्षा चोरून नेण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, रिक्षा चोरीला जात असल्याचे लक्षात येताच तक्रारदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपीचा पाठलाग सुरू केला. पाठलाग होत असल्याचे पाहून आरोपीने रिक्षा रस्त्यातच सोडून घटनास्थळावरून पळ काढला.
या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या रिक्षेची किंमत सुमारे ३ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. पुढील तपास पोलिस कर्मचारी हर्षल पाटील करीत आहेत.









