जळगाव (प्रतिनिधी):- भुसावळ तालुक्यात ड्युटीवर असताना अचानक चक्कर आल्याने ५७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रविण वासुदेव चौधरी (वय ५७, रा. दिपनगर, ता. भुसावळ, मूळ रा. डांभुर्णी, ता. यावल) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रविण चौधरी हे एमएसपीजी सीएलबीटीपीएस येथे ड्युटीवर कार्यरत होते. काम सुरू असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले.
घटनेनंतर सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांसह सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.











