मुंबई (वृत्तसंस्था) – जुन्या चाळीतील तसंच झोपडपट्टी रहिवाशांसाठी पुनर्विकासानंतर तयार होत असलेली घरे कोरोना रुग्णांसाठी ताब्यात घेण्याची योजना मुंबई महापालिकेने रद्द करावी अशी मागणी बृहन्मुंबई भाडेकरु परिषदेचे सरचिटणीस प्रकाश रेड्डी आणि अध्यक्ष प्रकाश नार्वेकर यांनी केली आहे.
आमची मागणी मान्य न झाल्यास रहिवासी अंबानींच्या अँटिलिया टॉवरमधील रिकाम्या फ्लॅटमध्ये घुसतील असा, इशाराही प्रकाश नार्वेकर यांनी दिली आहे. बृहन्मुंबई भाडेकरु परिषदेकडून यासंबंधी प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे.
मुंबईत अंबानी कुटुंबाची 22 मजल्यांची इमारत आहे. पाच जणांचं कुटुंब आहे. एका व्यक्तीला एक मजला दिला तरी 17 मजले उरतात. असे अनेक श्रीमंतांचे बंगले आहेत. ते कोरोना रुग्णांसाठी ताब्यात घ्या, असं बृहन्मुंबई भाडेकरु परिषदेनं म्हटलं आहे.
सरकारने भूखंड बिल्डराने देणे, मोकळ्या जागा आणि बंद पडलेल्या कारखान्याच्या जागा टॉवरसाठी देणं बंद करावे. त्यासाठी कायम स्वरुपाची सरकारी रुग्णालयं बांधावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.