अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
पाचोरा (प्रतिनिधी): पाचोरा तालुक्यातील जारगाव चौफुली जवळील अक्सा नगर भागात असलेल्या एका इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकाच्या गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी ९४,५०० रुपये किमतीचे तीन एअर कंडिशनर्स चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी नय्यूम जहांगीर देशमुख (वय ५०, रा. अक्सा नगर, जारगाव, पाचोरा) यांचे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे दुकान असून त्यांचे अक्सा नगर भागातच गोडाऊन आहे. दिनांक १ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेपासून ते १४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान, जेव्हा गोडाऊन बंद होते, तेव्हा अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी गोडाऊनमध्ये ठेवलेले गोदरेज कंपनीचे ३ एसी, ज्याची एकूण किंमत अंदाजे ९४,५००/- रुपये आहे, ते लबाडीच्या इराद्याने चोरून नेले.
या चोरीबाबत नय्यूम देशमुख यांनी १६ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९:३१ वाजता पाचोरा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल वसीम सलीम शेख हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.








