जळगाव जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या एका दूध डेअरीचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने २५ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी प्रशांत बाळकृष्ण सोनवणे (वय ४७, रा. खान्देश मिल कॉलनी, जळगाव) यांचे जळगाव शहरातील कॉम्प्लेक्समध्ये ‘श्रीपाद मिल्क कॉर्नर’ नावाचे दुधाचे दुकान (डेअरी) आहे. ८ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांनी दुकान नेहमीप्रमाणे बंद केले होते. मात्र, ८ एप्रिलच्या रात्री १० ते ९ एप्रिलच्या पहाटे ५:३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दुकानाच्या पत्राच्या दरवाजाचा भाग उचकटून आत प्रवेश केला.
चोरट्याने दुकानातील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली २५,००० रुपये किमतीची रोकड लंपास केली. यामध्ये ५००, २००, १००, ५०, २० आणि १० रुपयांच्या नोटांचा समावेश होता. ९ एप्रिल रोजी सकाळी दुकान उघडल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी प्रशांत सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनवणे करत आहे.









