एम.आय.डी.सी. पोलिसांची धडाकेबाज कारवाई
जळगाव (प्रतिनिधी):- शहरात दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, एम.आय.डी.सी. पोलिसांनी अवघ्या १२ तासांत मोटारसायकल चोरणाऱ्या एका संशयिताला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेली दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
तांबापुरा येथील रहिवासी अरुण सखाराम अहिरे (३८) यांनी ३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास आपली हिरो होंडा स्लेंडर (क्रमांक एमएच २८ जी ३२५६) घरासमोर हँडल लॉक करून लावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता त्यांना गाडी दिसून आली नाही. परिसरात शोध घेऊनही गाडी न मिळाल्याने त्यांनी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.


याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गोपनीय माहिती आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तांबापुरा परिसरातीलच मच्छी बाजार येथील संशयित आरोपी साहील मोहम्मद तडवी (वय २८) याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल जप्त केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या शोध पथकातील सपोनि धनके, पोकॉ नितीन ठाकूर, पोकॉ/ किरण पाटील, पोकॉ राहुल घेटे यांनी ही यशस्वी कामगिरी बजावली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ मनोज घुले हे करत आहेत. अवघ्या १२ तासांत आरोपीला पकडल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.









