जळगावात मध्यवर्ती भागात घरफोडी
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील मंजुषा हाउसिंग सोसायटी परिसरात असलेल्या एका बंद घराचे कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी ५७ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि तांब्याची भांडी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी प्रमोद नामदेव अटाळे (वय ५४, रा. नंदनवन कॉलनी, गणेश कॉलनी रोड) यांच्या वहिनी वंदना या मंजुषा हाऊसिंग सोसायटीत राहतात. दि. २५ मार्च ते ४ एप्रिल २०२६ दरम्यान त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी संधी साधली. चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि घरातील सोन्या-चांदीच्या वस्तू लंपास केल्या. शनिवारी, ४ एप्रिल रोजी सकाळी ही चोरी झाल्याचे लक्षात आले.
चोरट्यांनी घरातून एकूण ५७,००० रुपयांचा मुद्देमाल चोरीला नेला आहे. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादी प्रमोद अटाळे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील करत आहेत. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.









