अयोध्या नगरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील अयोध्या नगर भागातील माधुरी वेअर हाऊससमोर भरधाव डंपरने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला असून, धडक दिल्यानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.


खोटे नगरातील रहिवासी दीपक अरुण राऊत (वय ३८) हे २ एप्रिल रोजी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास आपल्या ‘रॉयल ३५० बुलेट’ने (क्र. एमएच-१९, डी ए २१३७) पेट्रोल भरण्यासाठी जात होते. अयोध्या नगर परिसरातील माधुरी वेअर हाऊस समोरून जात असताना, समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने (क्र. एमएच-१९, झेड-४१००) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, दीपक राऊत यांच्या दोन्ही पायांना, हाताला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांच्या दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघात झाल्यानंतर जखमीला मदत करण्याऐवजी डंपर चालक आपले वाहन घेऊन घटनास्थळावरून पळून गेला.
याप्रकरणी दीपक राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बारसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संजीव मोरे हे करीत आहेत.








