चाळीसगाव-धुळे रोडवर भीषण अपघात
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने सिग्नल आणि झेब्रा क्रॉसिंगकडे दुर्लक्ष करत दिलेल्या धडकेत एका २० वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना चाळीसगाव-धुळे रोडवरील दसेगाव फाट्याजवळ घडली. या घटनेत अन्य एक तरुणी गंभीर जखमी झाली असून, पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे.
गुरुवारी दि. २ एप्रिल रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास फिर्यादी वैष्णवी वैभव चौधरी (वय २०, रा. चाळीसगाव) आणि तिची मैत्रीण चंचल नामदेव लांडगे (वय २०, रा. रहीपुरी, ता. चाळीसगाव) या त्यांच्या सुझुकी ॲक्सेस स्कुटीने (क्रमांक एमएच ५२ ए ४३९१) रस्ता ओलांडत होत्या. यावेळी चाळीसगावहून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या डंपरने (क्रमांक एमएच ४१ बी के ९६८७) सिग्नल लाल असताना आणि समोर झेब्रा क्रॉसिंग असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले. डंपर चालकाने वाहन अत्यंत वेगात चालवून स्कुटीला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत चंचल लांडगे हिला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. तर फिर्यादी वैष्णवी हिच्या डाव्या हाताला आणि पायाला गंभीर इजा झाली आहे. अपघातानंतर डंपर चालक बाळू नामदेव माळी (रा. नागापूर, ता. नांदगाव) याने जखमींना कोणतीही वैद्यकीय मदत न देता किंवा पोलिसांना खबर न देता घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी चालक बाळू माळी याला रात्री २०:४२ वाजता अटक केली आहे. त्याच्यावर विविध कलमान्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











