दोन जण जखमी, तणावपूर्ण शांतता
जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील मेहरूण परिसरातील अशोक किराणा भागात आज संध्याकाळी दोन गटात जुन्या वादातून जोरदार दगडफेक झाल्याची घटना घडली. या घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. प्रॉपर्टीच्या वादातून हे प्रकरण उफाळून आल्याचे समजते.

इम्रान मुलतानी आणि अकील शाह दानिश शाह यांच्यात गेल्या काही काळापासून मालमत्तेच्या कारणावरून वाद सुरू आहेत. आज सकाळी याच कारणावरून दोन्ही गटात शाब्दिक चकमक होऊन शिवीगाळ झाली होती.
संध्याकाळी परिस्थिती चिघळली
सकाळच्या वादानंतर संध्याकाळी परिस्थिती पुन्हा विसकटली. अकील शाह यांच्या घरी लग्न समारंभासाठी कार्यक्रमानिमित्त पाहुणे आलेले असताना, इम्रान मुलतानी आणि त्याच्यासोबत असलेल्या ४ ते ५ जणांनी अकील शाह यांच्या घरावर धाव घेतली. यावेळी दोन्ही गट समोरासमोर आले आणि प्रचंड दगडफेक सुरू झाली. या अचानक झालेल्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले. घटनेत अकिल शाह यांच्या घराजवळ असणारी दुचाकी देखील फोडण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने तातडीने मेहरूण परिसरात धाव घेतली.
पोलिसांची गाडी येताना दिसताच गोंधळ घालणाऱ्या जमावाची पांगापांग झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. सध्या मेहरूण परिसरात शांतता असून, एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.









