१० दुचाकी हस्तगत
जळगाव (प्रतिनिधी) – शहरासह परिसरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरू असताना, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत नशिराबाद येथील एका २० वर्षीय अट्टल चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या तब्बल ३ लाख १० हजार रुपये किमतीच्या १० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

दिनांक २७ फेब्रुवारी रोजी फिर्यादी कल्पेश ज्ञानेश्वर चौधरी (रा. जुना खेडी रोड, जळगाव) यांची ‘हिरो स्प्लेंडर’ (क्र. एमएच १९ बीवाय ७४१३) भानु हॉटेल परिसरातून अज्ञात चोरट्याने लांबवली होती. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जळगाव जिल्ह्यात वाढत्या वाहन चोऱ्या लक्षात घेता, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास सुरू होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पथकाने समीर शेख शफीक शेख (वय २०, रा. ताज नगर, नशिराबाद) याला ताब्यात घेतले.
आरोपीची सखोल चौकशी केली असता, त्याने जळगावमधील शनिपेठसह एमआयडीसी, जिल्हापेठ आणि जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तसेच चक्क बुरहानपूर (मध्य प्रदेश) येथूनही मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण १० वाहने जप्त केली आहेत. आरोपीला पुढील कारवाईसाठी शनिपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, उपनिरीक्षक शरद बागल, अतुल वंजारी, विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, किशोर पाटील, रवींद्र कापडणे, राहुल रगडे, छगन तायडे, अजय पाटील आणि प्रवीण हिवराळे यांचा समावेश होता. पुढील तपास शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोहेकॉ प्रदीप नन्नवरे करत आहेत.









