शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सोनवणे, ठाकरे परिवारावर गुन्हे दाखल
जळगाव (प्रतिनिधी):- शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, चक्क पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गट एकमेकांना भिडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिपेठ पोलीस ठाण्याच्या आवारात शनिवारी दुपारी जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील १० ते १२ जणांना ताब्यात घेतले असून, शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी दुपारी १४ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शनिपेठ चौकीजवळ कैलास नारायण सोनवणे आणि राहुल उर्फ मोगली मोहन ठाकरे यांच्या कुटुंबात लाठ्या-काठ्यांनी जोरदार भांडण होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटांना शांत केले आणि पुढील चौकशीसाठी शनिपेठ पोलीस ठाण्यात आणले. दोन्ही गटांना पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या ठिकाणी बसवून त्यांचे जबाब घेण्याचे काम सुरू असताना, सायंकाळी ५:१५ वाजेच्या सुमारास अचानक दोन्ही गट पुन्हा आमनेसामने आले. पोलीस ठाण्याच्या आवारातच त्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. या गोंधळात पोलिसांचा लॅपटॉप टेबलवरून खाली पडून नुकसान झाले आहे.
पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी पोलिसांचे म्हणणे न ऐकता पोलीस ठाण्याच्या आवारातच जीवे मारण्याच्या उद्देशाने गोंधळ घातला आणि पोलिसांना त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून रोखले. याप्रकरणी राहुल उर्फ मोगली मोहन ठाकरे, जयेश विठ्ठल सोनवणे, आशिष उर्फ पैलवान शैलेश ठाकरे, यश उर्फ सागर अशोक बाविस्कर, कैलास नारायण सोनवणे, कल्पेश कैलास सोनवणे, रोहित कैलास सोनवणे, विलास नारायण सोनवणे, सागर प्रल्हाद सोनवणे व इतरांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष दादासाहेब खेडकर करत आहेत.









