पारोळा शहरातील घटना
पारोळा (प्रतिनिधी):- न्यायालयात दाखल असलेला खटला मागे घेण्याच्या कारणावरून लोणी सीम येथील एका ६० वर्षीय डॉक्टरांना भररस्त्यात अडवून मारहाण करत त्यांच्याकडील १५ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


डॉ. कैलास निळकंठ पाटील (वय ६०, रा. लोणी सीम, ता. पारोळा) हे १७ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आपल्या मोटारसायकलने (लोणी सीम परिसरातून) जात होते. त्यांच्यासोबत विलास रावण पाटील हे देखील बसलेले होते. नगाव गावाच्या अलीकडे सार्वजनिक जागी मागून आलेल्या एका राखाडी रंगाच्या मारुती सुझुकी सेलेरिओ कारने (क्रमांक एचएच ४६ डीव्ही ६०४८) डॉक्टरांच्या दुचाकीला ओव्हरटेक करून रस्ता अडवला. कारमधून उतरलेल्या संशयितांनी डॉ. पाटील यांना दुचाकीवरून खाली ओढले आणि शर्टची कॉलर पकडून चापटबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी संशयित महिलांनी त्यांच्याकडील चपलेने मारहाण केली. “तू आमच्याविरुद्ध पारोळा न्यायालयात दाखल केलेला खटला मागे घेतला नाही, तर तुझा मुडदा पाडेल,” अशी धमकी आरोपीने दिली.
त्यानंतर डॉक्टरांच्या खिशातील ५०० रुपयांच्या ३० नोटा (एकूण १५ हजार रुपये) जबरदस्तीने हिसकावून नेल्या. या घटनेनंतर फिर्यादी डॉ. पाटील यांनी पारोळा न्यायालयात धाव घेतली होती. माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपींमध्ये केतन दिलीप गोतरणे (वय २६), दमयंती दिलीप गोतरणे (वय ५०), साक्षी संतोष भोईर (वय ४५, (सर्व रा. कर्जत, जि. रायगड), याशिवाय इतर २ अनोळखी व्यक्तींवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) योगेश महाजन हे करीत आहेत.









