नराधमाला एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव तालुक्यातील एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या संशयित नराधमाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पीडित १२ वर्षीय मुलगी ही जळगाव तालुक्यातील एका भागात वास्तव्यास आहे. संशयित आरोपी संदीप बळीराम तायडे (रा. चिंचोली, ता. जळगाव) याने जानेवारीपासून पीडितेच्या बालमनाचा फायदा घेत, तिला गोड बोलून वेळोवेळी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्याने पीडितेचा विनयभंग देखील केला. दि. २ मार्च रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास, संशयित आरोपीने पीडितेस शाळेत सोडण्याच्या बहाण्याने घरून नेले. मात्र, तिला शाळेत न नेता अजंठा चौफुलीवरून भुसावळ रोडने नशिराबाद शिवारातील एका शेतात नेले. त्या ठिकाणी असलेल्या एका झोपडीत नेऊन आरोपीने पीडितेच्या मनाविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला.
याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून ४ मार्च रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६३(अ), ६४(१), ६५(१), ७४, ३५१(४) सह पोक्सो कायदा कलम ६, १०, १२ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी संशयित आरोपी संदीप तायडे याला अटक केली आहे.









