सात जणांवर गुन्हा दाखल
अमळनेर ( प्रतिनिधी ) – पैसे ‘दामदुपटीने’ वाढवून देण्याचे आमिष दाखवून अमळनेर येथील एका केळी व्यापाऱ्याची तब्बल ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी न्यायालयाने सात संशयित आरोपींविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आसिफ छोटू बागवान आहे. व्यापारानिमित्त त्यांचे छत्रपती संभाजीनगर आणि अजिंठा भागात येणे-जाणे होते. यादरम्यान त्यांची ओळख शेख मुजाहिद शेख मुकीत, अकबर मकबूल मेवाती, अब्दुल मुक्कीम अब्दुल खालिफ शेख, प्रकाश गायकवाड, नंदू जाधव, शाहरुख अब्दुल मुकीत आणि फिरोजखा भिकनखा मेवाती यांच्याशी झाली. या संशयितांनी “आम्ही तुमचे पैसे दुप्पट करून देऊ” असा बनाव रचून बागवान यांचा विश्वास संपादन केला.
आरोपींच्या आमिषाला बळी पडून आसिफ बागवान यांनी पत्नीचे दागिने विकले आणि इतरांकडून उसने पैसे घेऊन ११ लाख रुपये उभे केले. १७ डिसेंबर २०२२ रोजी आरोपींनी बागवान यांना बोलावले. पूजेच्या नावाखाली धूर करून त्यांना घराबाहेर काढले आणि त्यांच्या हातात नोटांच्या पुड्या दिल्या. त्यानंतर त्यांना धुळे रोडवर सोडून आरोपी पसार झाले.
बागवान यांनी घरी जाऊन नोटा तपासल्या असता त्या बनावट असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असता, आरोपींनी ५ लाख रुपयांच्या मालमत्तेचे प्रतिज्ञापत्र आणि ६ लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, तपासात ही मालमत्ता आणि धनादेश दोन्ही बनावट असल्याचे निष्पन्न झाले. अखेर पीडित व्यापाऱ्याने ॲड. सलमान शाह यांच्यामार्फत न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सर्व सातही आरोपींविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.









