ज्येष्ठ शिक्षक डी. व्ही. पाटील व संजय पाटील यांचा हृदयस्पर्शी निरोप समारंभ
पाचोरा (प्रतिनिधी): पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या येथील गो. से. हायस्कूलमध्ये शनिवार, दि. २८ फेब्रुवार रोजी किमान कौशल्य विभागातील ज्येष्ठ शिक्षक श्री. डी. व्ही. पाटील आणि नाईक पदावर कार्यरत असलेले संजय वामन पाटील यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

विद्यालयाच्या कलादालनात आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार भाऊसाहेब दिलीप वाघ, चेअरमन नानासाहेब संजय वाघ, ज्येष्ठ संचालक सतीश नारायण चौधरी, योगेश माधवराव पाटील, प्रगतशील शेतकरी प्रकाश पाटील, मुख्याध्यापक एन. आर. पाटील व उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात रुपेश पाटील यांच्या ईशस्तवनाने झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डी. व्ही. पाटील व संजय पाटील यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ व पोशाख देऊन गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक एन. आर. पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन व उद्देश स्पष्ट केला. उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ सेवेचा आढावा घेतला. किमान कौशल्य प्रमुख मनीष बाविस्कर यांनी डी. व्ही. पाटील सरांच्या शैक्षणिक योगदानावर प्रकाश टाकला.
संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ यांनी कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात खलील देशमुख यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांच्या निष्ठेबद्दल समाधान व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना डी. व्ही. पाटील यांनी संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, तर सोहम पाटील याने वडील संजय पाटील यांच्या सेवाप्रवासावर भाष्य करत भावना व्यक्त केल्या. या सोहळ्याला माजी पर्यवेक्षक शांताराम चौधरी, ए. जे. महाजन यांच्यासह सकाळ व दुपार सत्रातील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख महेश कौडिण्य यांनी केले.









