महानगरपालिकेत महासभेमध्ये पिठासीन अधिकाऱ्यांनी केली घोषणा
जळगाव ( प्रतिनिधी ) – महापालिकेच्या विशेष महासभेत आज शुक्रवार २७ रोजी स्थायी समिती व महिला-बालकल्याण समिती सभापतींची निवड प्रक्रिया पार पडली. या निवड प्रक्रियेत भाजपचे डॉ. चंद्रशेखर पाटील यांची स्थायी समितीपदी, तर शिवसेनेच्या सिंधू कोल्हे यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर झाली.

महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात विशेष महासभेचे आयोजन सकाळी अकरा वाजता करण्यात आले होते. व्यासपीठावर पीठासीन अधिकारी तथा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, तसेच नगरसचिव सतीश शुक्ला उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीला पीठासीन अधिकाऱ्यांनी स्थायी समिती सभापतिपदासाठी आलेल्या अर्जांची माहिती दिली.
डॉ. चंद्रशेखर पाटील यांचे चार अर्ज आले होते. यात पहिल्या अर्जावर सूचक म्हणून नितीन लढ्ढा व अनुमोदक विशाल भोळे होते.
अर्ज छाननीनंतर पंधरा मिनिटांचा माघारीचा अवधी देण्यात आला. मात्र, या कालावधीत अन्य कोणताही अर्ज मागे घेण्यात आला नाही. परिणामी, डॉ. पाटील यांची स्थायी समिती सभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
यानंतर महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी अर्ज छाननी करण्यात आली. सिंधू कोल्हे यांचे दोन अर्ज आले होते. पहिल्या अर्जात सूचक प्रतिभा देशमुख व अनुमोदक अमृता सोनवणे यांनी दाखल केला होता. अर्ज छाननीनंतर पंधरा मिनिटांचा माघारीचा अवधी दिला गेला. वेळ संपल्यानंतर अन्य कोणताही अर्ज मागे घेण्यात आला नसल्याने सिंधू कोल्हे यांची महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
निवडीनंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीतर्फे जल्लोष केला. महापौर दीपमाला काळे व उपमहापौर मनोज चौधरी यांनी पुष्पगुच्छ देऊन दोन्ही सभापतींचे अभिनंदन केले. यानंतर दोन्ही सभापतींनी आपल्या कक्षामध्ये जाऊन पदभार स्वीकारला.
तसेच महानगरपालिका सभागृह नेते पदासाठी ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी महापौर नितीन बालमुकुंद लढ्ढा यांची शिफारस गटनेते प्रकाश बालाणी यांनी केल्याची माहिती मिळाली आहे. लवकरच त्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.









