दुचाकीस्वार चोरट्यांचा थरार
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांचे धाडस वाढले असून, चालत्या दुचाकीवरून एका महिलेच्या गळ्यातील सोन्या-चांदीची साखळी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सिमा हसमुख सूर्यवंशी (वय ४३, रा. देवेंद्र नगर, जळगाव) या २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास आपल्या ‘प्लेझर’ दुचाकीने आनंद नगर येथील घरी जात होत्या. त्या मोहन नगर भागातील हिरकणी डेअरी जवळून संभाजी नगर स्टॉपकडे जाणाऱ्या रोडवर असताना, पाठीमागून एका दुचाकीवर दोन अज्ञात इसम आले. दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने चालत्या गाडीवरून मोठ्या शिताफीने सूर्यवंशी यांच्या गळ्यातील दागिने हिसकावले. यात एकूण ४२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. फिर्यादीने २३ फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे तपास करीत आहेत. शहरात भरवस्तीत आणि वर्दळीच्या रस्त्यावर अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.








