शिरसोली (प्रतिनिधी): जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील इंदिरानगर भागात एका २३ वर्षीय तरुणाने मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. पवन ऊर्फ सोनू नारायण ताडे असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरसोली प्र.न. इंदिरानगर (कुऱ्हाडदा रोड) परिसरात पवन आपल्या कुटुंबासह राहत होता. दिनांक २३ च्या मध्यरात्री त्याचे आई-वडील पुढच्या खोलीत झोपलेले होते. याच दरम्यान पवनने मागच्या खोलीत असलेल्या झोक्याला साडी बांधून गळफास घेतला. आज दिनांक २४ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास वडील नारायण ताडे हे पाणी पिण्यासाठी उठले असता, त्यांना पवन गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. हा धक्कादायक प्रकार पाहताच कुटुंबाने एकच आक्रोश केला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला कळविले. पवनला तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

आत्महत्येचे कारण: अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास सुरू आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. ऐन उमेदीच्या वयात मुलाने असे पाऊल उचलल्यामुळे ताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.








