जळगावात ‘तोतया’ पोलिसांचा धुमाकूळ
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात तोतया पोलिसांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, जुन्या जळगाव भागात एका वृद्ध महिलेला पोलीस असल्याची बतावणी करून सुमारे १ लाख ५६ हजार ९३१ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात तीन भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी कमलबाई एकनाथ सोनार (वय ६५, रा. स्नेह चौक, रामपेठ, जळगाव) या १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास जुन्या जळगावमधील भाग्यलक्ष्मी टेंट हाऊस चौकातून जात होत्या. यावेळी ३० ते ३५ वयोगटातील तीन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. आम्ही पोलीस आहोत, अशी बतावणी करत त्यांनी कमलबाई यांना विश्वासात घेतले. “पुढे साहेबांची तपासणी सुरू आहे, तुमचे दागिने काढून पिशवीत ठेवा,” असे सांगून या भामट्यांनी कमलबाईंच्या अंगावरील सोन्याचे दागिने हातचलाखीने लंपास केले आणि तिथून पसार झाले.
भामट्यांनी फिर्यादी महिलेकडून एकूण मुद्देमाल १ लाख ५६ हजार ९३१ रुपये लांबविण्यात आला आहे. घटना १० फेब्रुवारी रोजी घडली असली, तरी १९ फेब्रुवारी रोजी रात्री १०:४५ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कावेरी महादेव कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गणेश गुणराव नायकर हे करत आहेत.









