चोपड्यात पूर्ववैमनस्यातून घटना
चोपडा (प्रतिनिधी) : शहरातील हॉटेल सुयोग परिसरात एका ३८ वर्षीय दुध विक्रेत्यावर धारदार चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. “तुझ्या भावाचा मर्डर करायचा आहे,” असे म्हणत आरोपीने हा हल्ला चढवला. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेले माहितीनुसार, फिर्यादी राहुल गोपाळ गवळी (वय ३८, रा. बारीवाडा, चोपडा) हे १८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास चोपडा येथील हॉटेल सुयोग जवळील काउंटरपाशी उभे होते. यावेळी आरोपी संशयित भावड्या चौधरी (रा. मल्हारपुरा, चोपडा) हा राहुल गवळी यांच्याजवळ आला. “मला तुझा भाऊ वैभव टक्कल याचा मर्डर करायचा आहे,” असे म्हणत त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपीने आपल्याजवळील धारदार चाकूने राहुल यांच्या दोन्ही हातांवर वार केले. या हल्ल्यात राहुल गवळी गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून चोपडा शहर पोलिसांनी आरोपी भावड्या चौधरी विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका देखील आरोपीवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी करत आहेत. गुन्ह्याची नोंद १९ फेब्रुवारी रोजी पहाटे १:२३ वाजता करण्यात आली आहे.









