यावलमध्ये धाडसी घरफोडी
यावल (प्रतिनिधी): शहरात चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून, विरार नगर भागात एका घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ५ लाख ५० हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

विरार नगरमधील रहिवासी आणि जिलेबी सेंटर चालवणारे व्यावसायिक शेख साबीर शेख प्यारेसाहेब (३४) हे १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास बाहेर गेले होते. दरम्यान, १७ फेब्रुवारीच्या रात्री १० वाजेपर्यंत त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून त्यात ठेवलेली ५ लाख ५० हजार रुपयांची रोकड आणि ३८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातले जोड असा एकूण ५,८८,००० रुपयांचा माल चोरून नेला.
याप्रकरणी शेख साबीर यांनी १८ फेब्रुवारी रोजी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन तपास करत आहे.









