जळगावात धावत्या बसमध्ये धाडसी चोरी
जळगाव (प्रतिनिधी): शहरातून लग्नासाठी पाळधीकडे जाणाऱ्या एका महिलेच्या पिशवीतून अज्ञात चोरट्याने ३८ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जळगाव शहरातील पिंपराळा भागातील रहिवासी सुनीता अशोक बारी (वय ५२) या १० फेब्रुवारी रोजी सकाळी जळगाव ते छत्रपती संभाजीनगर बसने पाळधी येथे एका लग्नासाठी जात होत्या. सकाळी ११:४५ ते दुपारी १२:५० च्या सुमारास बस प्रवासात असताना, गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळील कापडी पिशवी धारदार वस्तूने कापली.
पिशवीमध्ये ठेवलेले दागिने चोरट्याने लंपास केले. एकूण वजन ३८ ग्रॅमचे अंदाजे किंमत: ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. सुनीता बारी यांनी याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भटू पाटील करत आहेत. प्रवासादरम्यान नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.









