जळगाव महापालिकेत उद्या महत्त्वाची बैठक
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ नंतर आता खऱ्या अर्थाने कामकाजाला गती मिळणार आहे. महापौर दिपमाला मनोज काळे यांनी स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीवरील नवीन सदस्यांच्या नियुक्तीसाठी बुधवारी, ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता विशेष बैठक बोलावली आहे.


महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २० (२) नुसार नवनिर्वाचित सदस्यांमधून स्थायी समिती गठित करण्यासाठी चर्चा केली जाईल. महिला व बालकल्याण समितीवर सदस्यांचे नामनिर्देशन करण्यासाठी कलम ३१ (३) उपकलम (२) आणि कलम ३० (१अ) व (२) मधील तरतुदींनुसार निर्णय घेतला जाईल.
विविध राजकीय पक्षांचे सभागृहातील संख्याबळ लक्षात घेऊन या समित्यांवरील सदस्यांची नियुक्ती निश्चित केली जाणार आहे. या बैठकीसाठी उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांच्यासह भाजपचे गटनेते प्रकाश रावलमल बालानी, शिवसेनेचे विष्णू रामदास भंगाळे, शिवसेना (उबाठा) गटाचे इब्राहीम मुसा पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रफुल्ल गुलाबराव देवकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या आगामी कामकाजाच्या दृष्टीने या समित्यांची स्थापना अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.








