जळगाव ( प्रतिनिधी ) – डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथील डीयूपीएमसी सभागृहात जागतिक कुष्ठरोग दिन निमीत्त जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचा उद्देश रोगाचे लवकर निदान, योग्य उपचार, अपंगत्व प्रतिबंध तसेच कुष्ठरोगाशी संबंधित सामाजिक कलंक दूर करणे हा होता. या जनजागृती कार्यक्रमासाठी डॉ. सौरव मुले हे संसाधन व्यक्ती उपस्थित होते. त्यांनी कुष्ठरोगाची कारणे, लक्षणे, निदान, उपचार व पुनर्वसन याविषयी सविस्तर माहिती दिली. कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार असून लवकर निदान झाल्यास अपंगत्व टाळता येते, यावर त्यांनी विशेष भर दिला. तसेच कुष्ठरोगग्रस्त रुग्णांच्या पुनर्वसनामध्ये व सामाजिक पुनर्वसनामध्ये फिजिओथेरपिस्टची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे संचालन व मार्गदर्शन डॉ. जिज्ञासा अत्तरदे तर आभार डॉ. आश्लेषा यांनी मानले. कार्यक्रमात विद्यार्थी व प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.जागतिक कुष्ठरोग दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून आरोग्यविषयक जनजागृती व सामाजिक जबाबदारीचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.










