चौकाचौकात रस्ता सुरक्षेची साद : अखिल विश्व धर्म ज्ञान संस्थेचा पुढाकार
जळगाव (प्रतिनिधी):- वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष आणि त्यामुळे वाढणारे अपघात हे शहरासाठी गंभीर संकट ठरत असताना, या समस्येवर थेट प्रहार करत अखिल विश्व धर्म ज्ञान संस्थेतर्फे शनिवारी जळगाव शहरातील प्रमुख चौकांमध्ये रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. ‘नियम पाळा, जीव वाचवा’ या ठळक संदेशासह रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांनी वाहनचालकांना क्षणभर थांबून विचार करायला भाग पाडले.

जिल्हा पोलीस दलाच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या अभियानात संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हातात जनजागृतीचे फलक घेऊन चौकाचौकात उभे राहिले होते. हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे, सिग्नल तोडणे, वेगमर्यादा झुगारणे अशा सवयी थेट अपघातांना आमंत्रण देत असल्याचे फलकांद्वारे मांडण्यात आले. नेहमी गडबडीत असलेले वाहनचालकही या वेळी फलक वाचताना दिसले, हीच या उपक्रमाची प्रभावीता सांगणारी बाब ठरली.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, वाहतूक पोलीस निरीक्षक पवन देसले, पोलिस हेड कॉन्स्टेबल मेघना जोशी यांच्यासह उपस्थित सर्व वाहतूक पोलिसांचे सहकार्य लाभले. रॅली यशस्वीतेसाठी संस्थेचे मुबीना शेख, इशरत जहा, सरवत जहा, आमेना शेख, निकहत शेख, आफरीन खाटीक, इमरान खाटीक, रंजना सपकाळे, कामरान शेख, रय्यान अली, आणि सालीक शेख यांनी परिश्रम घेतले.










