भुसावळ तालुक्यात साकरी गावात घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील साकरी येथे दोन मुलींना विहिरीत ढकलल्याच्या संशयावरून मोठा वाद उफाळून आला आहे. या संशयापोटी जमावाने बेकायदेशीररीत्या एकत्र येत फिर्यादी आणि साक्षीदारांच्या घरावर दगडफेक करत जाळपोळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये १५ ते २० अज्ञात इसमांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, साकरी गावातील दोन मुली विहिरीत पडल्याची घटना घडली होती. फिर्यादी सतीश नारायण वारके (वय ५३) आणि साक्षीदार नरेंद्र गणेश चौधरी यांच्या मुलांनीच या मुलींना विहिरीत ढकलले असा संशय ग्रामस्थांमध्ये पसरला होता. याच रागातून दि. २७ जानेवारी रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजेच्या सुमारास १५ ते २० जणांचा जमाव हातात काठ्या आणि दगड घेऊन फिर्यादींच्या घराकडे धावून गेला.
संतप्त जमावाने सतीश वारके आणि नरेंद्र चौधरी यांच्या घरावर जोरदार दगडफेक केली. इतक्यावरच न थांबता, जमावाने कोणत्यातरी ज्वलनशील पदार्थाचा वापर करून घरातील जीवनावश्यक वस्तू पेटवून दिल्या. तसेच घराचे कुलूप तोडून आतील साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करून नुकसान केले.
दंगलखोरांनी केवळ मालमत्तेचे नुकसान केले नाही, तर फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. “जर गावात पुन्हा दिसलात, तर तुम्हास जिवंत सोडणार नाही,” अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याप्रकरणी सतीश वारके यांनी दिलेल्या तक्रारीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक महेश गायकवाड अधिक तपास करत आहेत.









