जळगाव जीएमसीच्या वैद्यकीय पथकाला यश
जळगाव ( प्रतिनिधी ) – दुर्मिळ व जीवघेण्या गुइलेन–बारे सिंड्रोम या आजाराशी झुंज देणाऱ्या तनुजा तडवी यांनी तब्बल ५३ दिवसांच्या कठोर उपचारांनंतर मृत्यूवर मात केली असून आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या या संघर्षमय प्रवासाने आशा, जिद्द आणि आधुनिक वैद्यकीय सेवेची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

गुइलेन–बारे सिंड्रोम हा एक दुर्मिळ पण गंभीर ऑटोइम्यून आजार आहे. या आजारात शरीराची प्रतिकारशक्ती स्वतःच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते. यामुळे हात-पायातील कमजोरी, सुन्नपणा, चालण्यात अडचण, तसेच गंभीर अवस्थेत श्वसन स्नायू निकामी होऊन रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज भासू शकते. अनेकदा हा आजार व्हायरल किंवा जंतुसंसर्गानंतर दिसून येतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आजाराच्या तीव्र अवस्थेत श्वसन स्नायूंवर परिणाम झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. मात्र डॉक्टरांच्या नियोजनबद्ध उपचार, सतत निरीक्षण आणि उत्कृष्ट टीमवर्कमुळे त्यांना हळूहळू व सुरक्षितरीत्या व्हेंटिलेटरवरून काढण्यात यश आले.
या दीर्घकालीन उपचार प्रक्रियेत रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर व नर्सिंग स्टाफने अहोरात्र मेहनत घेतली. या उपचारांचे नेतृत्व अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक शेजवळ, औषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. पाराजी बाचेवार आणि श्वसनरोग वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. विश्वनाथ पुजारी यांनी केले. तसेच न्यूरोलॉजिस्ट डॉ. अभिजित पिल्लई, डॉ. गोपाळ घोलप, डॉ. सायली पाटील, डॉ. स्वप्नील चौधरी, डॉ. अमित भंगाळे, डॉ. नेहा चौधरी, डॉ. यतिन बोरोले, डॉ. तेजस कांबळे, डॉ. अंकिता काळे, डॉ. प्रशांत अंधाले, डॉ. प्रतिक्षा औटी, डॉ. तुषार राठोड आणि डॉ. पराग चोले यांनी रुग्णाच्या उपचारात महत्त्वाची भूमिका बजावली.
तसेच इंचार्ज सिस्टर श्वेता तापकीरे आणि नर्सिंग ऑफिसर हर्षाली तवाडे यांच्यासह संपूर्ण नर्सिंग स्टाफने अत्यंत समर्पणाने रुग्णसेवा बजावली.









