आ. राजुमामा भोळे, आ. किशोर पाटील यांनी बारामतीला भेट देऊन वाहिली अजितदादांना श्रद्धांजली
जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठी पोकळी निर्माण झाली असून, तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देणारा एक कणखर नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजुमामा) यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


आमदार राजुमामा भोळे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले की, “अजितदादा केवळ एक नेते नव्हते, तर ते कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे ऊर्जास्थान होते. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आम्ही केवळ ऐकून होतो, मात्र त्यांच्यासोबत काम करताना ती कार्यपद्धती आम्हाला जवळून अनुभवता आली. प्रशासनावर असलेली त्यांची कमालीची पकड आणि कठीण प्रसंगी धाडसी, ठाम निर्णय घेण्याची त्यांची वृत्ती थक्क करणारी होती.”
जनतेच्या प्रश्नांप्रती असलेली त्यांची संवेदनशीलता आणि कामाचा उरक हे गुण आम्हा लोकप्रतिनिधींसाठी नेहमीच शिकण्यासारखे होते, असेही त्यांनी नमूद केले. दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पाचोरा आ. किशोर पाटील यांनी घेतले अंत्यदर्शन
अजितदादांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे. पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आ. किशोर पाटील यांनी मुंबईत अजित पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी पवार कुटुंबाचे सांत्वन करत दादांना आदरांजली वाहिली. जळगाव जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी दादांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून, प्रशासकीय शिस्त आणि विकासाचा ध्यास असलेला नेता काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.









