जिल्हाध्यक्षांची कडक कारवाई, निवडणूक अधिकाऱ्यांना विरोधात कोर्टात याचिका दाखल
जळगाव ( प्रतिनिधी ) – पक्षादेशाचे उल्लंघन आणि पक्षविरोधी कृत्य केल्याचा ठपका ठेवत फैजपूर नगर परिषदेतील ४ काँग्रेस नगरसेवकांना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीपराव पवार यांनी ‘कारण दाखवा’ नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, ७ दिवसांच्या आत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

फैजपूर नगरपालिकेत काँग्रेस पक्षाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतंत्र गटाची नोंदणी केलेली आहे. नामनिर्देशित सदस्य निवडीसाठी पक्षाच्या बैठकीत डॉ. शेख दानिश शेख निसार यांच्या नावावर एकमत झाले होते. मात्र, गट नेते शेख इरफान शेख इकबाल यांनी पक्षाने ठरवलेल्या नावाव्यतिरिक्त भारतीय जनता पक्षाचे पवन अनिल सराफ यांचे नाव सुचवले. पक्षाने ठरवलेल्या उमेदवाराला डावलून विरोधी पक्षाच्या उमेदवाराचे नाव सुचवणे हा गंभीर शिस्तभंग असल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीने म्हटले आहे.
या नगरसेवकांना बजावली नोटीस
१. हकीम एमत तडवी (प्रभाग क्र. १)
२. सादेका बी. शेख दानिश (प्रभाग क्र. २)
३. प्रियांका ईश्वर इंगळे (प्रभाग क्र. ७)
४. शेख इरफान शेख इक्बाल (प्रभाग क्र. ८)
न्यायालयात धाव
या प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी डॉ. शेख दानिश यांचा अर्ज बेकायदेशीररित्या बाद ठरवला, ज्यामुळे भाजप उमेदवाराचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. या निर्णयाविरोधात जळगाव सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही माहिती जिल्हा सरचिटणीस जमील शेख व ज्ञानेश्वर कोळी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
“जिल्ह्यात पक्षविरोधी कृत्य करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. संबंधित नगरसेवकांनी ७ दिवसात लेखी खुलासा सादर न केल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर व संघटनात्मक कारवाई केली जाईल.”
— बाळासाहेब प्रदीपराव पवार (जिल्हाध्यक्ष, जळगाव जिल्हा काँग्रेस)









