सीईओंच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही सुरू
जळगाव प्रतिनिधी – जिल्हा परिषद, जळगाव यांच्या मालकीच्या जिल्ह्यातील वापरात नसलेल्या, जीर्ण व धोकादायक ठरलेल्या इमारती व कार्यालये निर्लेखित (रद्द) करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या आदेशानुसार राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यात विविध ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या अनेक कार्यालयीन इमारती सध्या वापरात नाहीत. दीर्घकाळापासून देखभाल न झाल्यामुळे या इमारती जीर्ण झाल्या असून काही ठिकाणी त्या नागरिकांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण करणाऱ्या ठरत आहेत. अशा अडगळीत पडलेल्या व अनुपयोगी झालेल्या इमारतींची सखोल तपासणी करून त्या निर्लेखित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेमुळे भविष्यात संभाव्य अपघात टाळण्यास मदत होणार असून, जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचे योग्य नियोजन करता येणार आहे. तसेच निर्लेखित करण्यात येणाऱ्या इमारतींच्या जागेचा उपयोग विकासात्मक व लोकहिताच्या कामांसाठी करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
सदर मोहीम नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येत असून, जिल्हाभरातील जिल्हा परिषद मालकीच्या मोठ्या प्रमाणातील इमारती या प्रक्रियेत निर्लेखित केल्या जाणार आहेत.








