रावेर तालुक्यात सावदा येथील घटना
सावदा (प्रतिनिधी): रावेर तालुक्यातील सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शासकीय मालमत्तेच्या चोरीची एक मोठी घटना समोर आली आहे. हतनूरच्या उजव्या कालव्यालगत असलेली सुमारे ७ लाख ९४ हजार ३१० रुपये किमतीची २७३९ ब्रास माती अज्ञातांनी चोरून नेल्याप्रकारणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या हतनूर धरणाच्या उजव्या कालव्यावरील साखळी क्रमांक ५५२० मीटरवर, तासखेडा-थोरगव्हाण रस्ता पुलाच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर मातीचा साठा होता. सन २००३ ते २०२५ या प्रदीर्घ कालखंडादरम्यान या ठिकाणाहून तब्बल २७३९ ब्रास माती चोरट्यांनी टप्प्याटप्प्याने चोरून नेली. या चोरीची माहिती समोर आल्यानंतर विभागात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी हतनूर धरणाचे शाखा अधिकारी भावेश संजय चौधरी (वय २८, रा. चोळई, ता. भुसावळ) यांनी सावदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शासकीय मालमत्तेची चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कायदेशीर कारवाई केली आहे. या फिर्यादीवरून सावदा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे आणि सावदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल नारायण गजरे करत आहेत.









