कन्नड तालुक्यातील तिघांविरुद्ध पारोळ्यात गुन्हा दाखल
पारोळा (प्रतिनिधी): ऊसतोडणीसाठी केलेल्या कराराच्या वेळेवरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाण आणि लुटीमध्ये झाल्याची धक्कादायक घटना पारोळा तालुक्यातील शेवगे तांडा येथे घडली आहे. याप्रकरणी तीन संशयितांविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सोना भुरा पवार (वय ५५, रा. शेवगे तांडा ता. पारोळा) हे मजुरी आणि ऊसतोडणीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी संशयित आरोपी उमेश रामचंद्र चव्हाण याच्याशी सन २०२६ च्या हंगामासाठी ऊसतोडणीचा करार केला होता. करारानुसार फिर्यादी डिसेंबर २०२५ मध्ये कामावर जाणार होते. मात्र, आरोपींनी त्यांना नोव्हेंबरमध्येच कामावर येण्यासाठी जबरदस्ती सुरू केली. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे कामावर असतानाही आरोपींनी त्यांना मारहाण केली होती.
त्यानंतर फिर्यादी आपल्या मूळ गावी शेवगे तांडा येथे परतले असता, १० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास आरोपींनी त्यांच्या घरी येऊन पुन्हा राडा घातला. आरोपींनी फिर्यादीच्या घरात घुसून अश्लील शिवीगाळ केली आणि “आत्ताच्या आत्ता कामावर चल, नाहीतर तुझे कांड करू” अशी धमकी दिली. यावेळी झालेल्या झटापटीत आरोपींनी सोना पवार यांना पोटात व तोंडावर मारहाण केली. एवढेच नव्हे तर, त्यांच्या खिशातील मजुरीचे ५,००० रुपये रोख बळजबरीने काढून घेतले. तसेच “बाकीचे पैसे तुला किडनॅप करून वसूल करू,” अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले.
घटनेनंतर फिर्यादीने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेतली होती, मात्र सुरुवातीला पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. पोलिसांकडून अपेक्षित कारवाई न झाल्याने फिर्यादीने जळगाव पोलीस अधीक्षकांकडे दाद मागितली आणि अखेर न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर आता संशयित आरोपी रविंद्र रामचंद्र चव्हाण (वय ४५), उमेश रामचंद्र चव्हाण (वय ३६), मगन नारायण चव्हाण (वय ४०,सर्व रा. बादलपुरा तांडा, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जयंत सपकाळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.









