जामनेर तालुक्यातील गोंदेगाव येथील घटना
जामनेर (प्रतिनिधी): बनावट कागदपत्रे आणि दुसऱ्याची मालमत्ता स्वतःची असल्याचे भासवून ‘क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड’ बँकेकडून १० लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार जामनेर तालुक्यातील गोंदेगाव येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपी विजयकुमार नंदकुमार शेलार आणि आकाश विजय शेलार (दोन्ही रा. गोंदेगाव, ता. जामनेर) यांनी जळगाव येथील क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड बँकेच्या शाखेतून ग्रामीण विकास कर्ज योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी अर्ज केला होता. इलेक्ट्रिक आणि किराणा दुकानाच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी १० लाख ५० हजार रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. कर्ज मंजूर करण्यासाठी त्यांनी गोंदेगाव येथील मालमत्ता क्रमांक ३४/१ अ ही गहाण ठेवली. मात्र, जेव्हा कर्जाचे हप्ते थकले, तेव्हा बँकेने चौकशी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले.
तपासणीत असे आढळले की, ज्या मालमत्तेचे कागदपत्रे बँकेला देण्यात आले होते, तिथे आरोपी राहत नसून त्यांचा नातेवाईक प्रफुल्ल शेलार राहत होता. आरोपींनी प्रफुल्ल शेलार यांची मालमत्ता स्वतःची असल्याचे भासवले होते. यासाठी त्यांनी बनावट नमुना नंबर ८, प्रोसिडिंग बुक, बनावट घरपट्टी पावती (२०१४ ते २०२४, बनावट गावठाण प्रमाणपत्र, आकाश शेलार यांच्या नावाचे बनावट बक्षीसपत्र अशी खोटी कागदपत्रे तयार करून बँकेची आणि फिर्यादीची दिशाभूल केली.
याप्रकरणी फिर्यादी विश्वास बाळू नागरे (वय ३४, रा. नाशिक, ह.मु. मालेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









