अमळनेर तालुक्यातील अंबाडे येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी): अमळनेर तालुक्यातील अंबाडे येथील एका ५२ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मारवड पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विलास आप्पा पाटील (वय ५२, रा. अंबाडे, ता. अमळनेर, जि. जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. विलास पाटील यांनी करणखेडे रोडला लागून असलेल्या त्यांच्या मालकीच्या धान्य आणि शेतीची अवजारे ठेवण्याच्या घरामध्ये लोखंडी पाईपला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.
पीडित व्यक्तीच्या पुतण्याने घराबाहेर गर्दी झाल्याचे पाहून तिथे धाव घेतली असता, आपले चुलते गळफास घेतलेल्या अवस्थेत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी गावातील सुनील विक्रम सैंदाणे आणि सुनील मनसाराम पाटील यांच्या मदतीने गळ्यातील दोरी कापून त्यांना खाली उतरवले आणि तातडीने खाजगी वाहनाने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, सायंकाळी ५:५० वाजता तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती विलास पाटील यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मारवड पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पिंगळे आणि पोलीस उपनिरीक्षक विनोद तोरण्या पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.









