पाचोऱ्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
पाचोरा (प्रतिनिधी): तालुक्यातील एका शिवारात एका १८ वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून गेल्या दीड वर्षांपासून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगी (वय १८ वर्षे २ महिने) हिने पाचोरा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित आरोपी विशाल अशोक बागडे (मूळ रा. चिंचोरी, ता. नांदगाव, जि. नाशिक; ह.मु. गाळण, ता. पाचोरा) याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. मे २०२३ पासून, जेव्हा पीडिता अल्पवयीन होती, तेव्हापासून आरोपीने तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार तालुक्यातील एका शिवारातील खदाणीत आणि पीडितेच्या राहत्या घरी वेळोवेळी घडला आहे. पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
पाचोरा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम आणि पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश के. गणगे करत आहेत.









