नागरिकांना अंत्यदर्शनासाठी पार्थिव विद्यानगरी चौकात होणार दाखल
पुणे (वृत्तसेवा) : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांचे आज २८ जानेवारी रोजी दुःखद निधन झाले आहे. बारामतीत झालेल्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बारामतीत मेडिकल कॉलेजबाहेर समर्थकांची गर्दी उसळली आहे. तर, संपूर्ण पवार कुटुंबही बारामतीत दाखल झाले आहेत. उद्या, २९ जानेवारी रोजी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६ या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान, अजित पवारांचं पार्थिव आज सायंकाळी ४ वाजल्यापासून विद्याप्रतिष्ठान विद्यानगरी चौक येथील मैदानात अंत्यदर्शनाकरता रात्री उशिरापर्यंत नागरिकांसाठी ठेवण्यात येणार आहे. उद्या २९ जानेवारी सकाळी ९ वाजता गदिमा सभागृहापासून अंत्ययात्रा निघेल. गदिमा चौक, विद्यानगरी चौक, विद्याप्रतिष्ठानचा अंतर्गत रस्ता, मराठी शाळेच्या गेटने विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर जाईल. सकाळी ११ वाजता विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार होईल. बारामती येथे विमानाचे लँडिग होत असताना अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की विमान जळून खाक झाले आहे. आज बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या चार सभा होणार होत्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी या सभांचे आयोजन करण्यात आले होते.
सुपे जिल्हा परिषद गटासाठीही एक सभा होणार होती. यासाठी अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीमध्ये आले होते. मात्र विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, शरद पवारांसह संपूर्ण कुटुंब बारामतीत दाखल झालं असून उद्या, २९ जानेवारी रोजी अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, यात अजित पवारांसह मुंबई पीएसओ हेडकॉन्स्टेबल विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, पिंकी माळी फ्लाईट अटेंडंट होते. या सर्वांचा यात मृत्यू झाला आहे. मुंबईतून हे विमान सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी निघाले होते. तर, बारामती येथे ८.५० मिनिटांनी पोहोचले. लँडिंग करत असतानाच या विमानाचा अपघात झाला अन् आतील प्रवाशांचा मृत्यू झाला.
राज्यात शासकीय दुखवटा जाहीर
दरम्यान, राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल. तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे बुधवार, दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये बंद राहतील, असे कळविण्यात आले आहे.









